top of page

 खनिजसंपत्ती : खनिज पदार्था  पासून इंधनाशिवाय धातू, विविध उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल, बांधकामाची सामग्री इ. मिळतात. महाराष्ट्रात दगडी कोळशाशिवाय मँगॅनिजाची आणि लोखंडाची धातुके बऱ्याच प्रमाणात आढळतात. तसेच बॉक्साइट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट व बांधकामाचे खडक यांचे महत्त्वपूर्ण साठे महाराष्ट्रात असून डोलोमाइट, कायनाइट, सिलिमनाइट, सिलिकायुक्त वाळू व उद्योगधंद्यांत वापरल्या जाणाऱ्या मृत्तिका या खनिजपदार्थांचेही थोडे साठे महाराष्ट्रात आहेत. 

महाराष्ट्राच्या १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज पदार्थ आढळतात व त्यांपैकी १६.४ टक्के क्षेत्राचे भूवैज्ञानिक मानचित्रण झालेले आहे. महाराष्ट्रातील बहुतेक खनिजसंपत्ती ⇨दक्षिण ट्रॅपखडकाच्या बाहेरील क्षेत्रात आणि मुख्यत्वे स्फटिकी व रुपांतरित खडकांत आढळते. पूर्व विदर्भ (चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर व यवतमाळ जिल्हे) व दक्षिण महाराष्ट्र सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड व ठाणे जिल्हे) या दोन भागांत महाराष्ट्रातील खनिज संपत्ती एकवटलेली आहे. 

 पूर्वी भंडारा व रत्नागिरी (मालवण) जिल्ह्यांत लोणारी कोळसा वापरून लोखंड बनविण्याच्या छोट्या भट्ट्या होत्या. त्यांकरिता

इंधन व क्षपणकारक [⟶ क्षपण] म्हणून लोणारी कोळसा वापरीत. मोठ्या कारखान्यांच्या स्पर्धेमुळे हा उद्योग बंद झाला. चंद्रपूर भागात दगडी कोळसा काढण्यास एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास, तर मँगेनिजाचे धातुक काढण्यास १९०० च्या सुमारास सुरूवात झाली. तांब्यासाठी चंद्रपूर व रत्नागिरी जिल्ह्यांत आणि हिरे, सोने, शिसे, अँटिमनी वगैरेंचा इतरत्र शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. आता महाराष्ट्रातील खनिज संपत्तीच्या समन्वेषणाचे काम भूविज्ञान व खाणकाम संचालनालयातर्फे केले जाते. त्यासाठी भूवैज्ञानिक मानचित्रण, वेधन, गर्तन (खड्डे घेणे), खंदक खोदणे व रासायनिक विश्लेषण करणे ही कामे केली जातात. यांतून महत्त्वाच्या खनिज पदार्थांचा शोध लागू शकतो व त्यांच्या साठ्यांविषयी अंदाज करता येतात. हे संचालनालय खनिज पदार्थविषयीच्या माहितीचे संकलनही करते. शिवाय काही महत्त्वाच्याखनिजां च्या पूर्वेक्षणाचे कामही संचालनालयाने केले आहे (उदा., १९७५−७७ या काळात नागपूर जिल्ह्यात दगडी कोळसा, काही धातू व सोने यांचे, तर भंडारा जिल्ह्यात कायनाइट, सिलिमनाइट यांच्यासह सर्व खनिज पदार्थांचे पूर्वेक्षण करण्यात आले होते). महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीचे उत्पादन वमूल्य कोष्टक क्र. १ वरून स्पष्ट होईल. पुढे महाराष्ट्रातील काही खनिज पदार्थाची माहिती थोडक्यात दिली आहे. 

मँगॅनीज धातुके : भारतातील यांच्या साठ्यांपैकी सु ४० टक्के साठे महाराष्ट्रात आहे. हे साठे मुख्यतः भंडारा जिल्ह्यात असून येथील काही साठे भारतातील मोठ्या साठ्यांपैकी आहेत. थोडे साठे नागपूर जिल्ह्यात आहेत. या भागातील धातुके गोंडाइट मालेच्या खडकांशी निगडीत असून सिलोमिलेन हे त्यांतील मुख्य खनिज आहे. बहुधा उघड्या खाणींतून व मानवी श्रमाचा वापर करून येथील धातुके काढण्यात येतात. कन्हान व तुमसर येथे फेरोमँगॅनीज बनविण्याची संयंत्रे उभारण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मँगनीज धातुक परदेशी निर्यात होते. रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांतही कमी दर्जाचे थोडे धातुक आढळते. 

लोह धातुक : देशातील २ टक्के लोह धातुकांचे साठे महाराष्ट्रात आहेत. हे सारे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व सिधुदुर्ग या जिल्ह्यांत आहेत. उच्च दर्जाचे धातुक धारवाडी संघाच्या खडकांशी निगडित असून हेमेटाइट हे यातील महत्त्वाचे खनिजआहे. हे मँगॅनिजाच्या धातुकाप्रमाणेच काढण्यात येते. टॅकोनाइट व जांभ्यात कमी दर्जाचे धातुक आढळते. पैकी टॅकोनाइट चंद्रपूर, गडचिरोली,नागपूर व भंडारा या आणि जांभा रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा या जिल्ह्यांत आढळतात. 

बॉक्साइट :  महाराष्ट्रात याचे ६.५ कोटी टन साठे असावेत. मुख्यतः कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे आणि थोड्या प्रमाणात सांगली व सातारा या जिल्ह्यांत हे आढळते. भारतातील याच्या उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. 

इस्मेनाइट : हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सु. ४० किमी. लांबीच्या किनारी भागातील वाळूत आढळते. हा साठा २० लाख टन असावा. या वाळूत २० ते ७४ टक्क्यांपर्यंत इल्मेनाइट असून शुद्धीकरण केल्यास तिचा उपयोग करता येईल. त्रावणकोर किनाऱ्यावरील वाळूच्या मानाने येथील वाळू कमी दर्जाची असून येथे तिच्यात झिर्कॉन आढळत नाही. 

क्रोमाइट :  महाराष्ट्रात या खनिजाचे ५.५ कोटी टन साठे असून ते भंडारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांत आहेत. 

चुनखडी, कंकर व डोलोमाइट : यांचा महाराष्ट्रातील साठा भारताच्य ९ टक्के व उत्पादन २ टक्के आहे. यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतील यांचे साठे विंध्यन खडकांतील आहेत. अंतरा-ट्रॅपी थरांमधील चुनखडी, तसेच कंकर बहुतेक (विशेषतः नागपूर, नांदेड,सांगली, सिंधुदुर्ग व सातारा) जिल्ह्यांत आढळतात. डोलोमाइट गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत आढळते. १९६१ चे पायाभूत वर्ष धरून कंसातीलआकडे शेकडेवारी दर्शवितात. 

आधार : (१) भारतीय खाण कार्यालय, भारत सरकार, नागपूर.

(२) साहाय्यक मीठ आयुक्त, भारत सरकार, मुंबई (फक्त मिठाकरिता).   कायनाइट व सिलिमनाइट : ही दोन्ही खनिजे मुख्यत्वे भंडारा जिल्ह्यांत आढळतात. भारतातील कायनाइटच्या उत्पादनापैकी सु. १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.  

यांशिवाय महाराष्ट्रात पुढील खनिज पदार्थही थोड्या प्रमाणात आढळतात. सिलिकामय वाळू मुख्यतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत आढळते व १९८१ साली ७४ हजार टन वाळू काढण्यात आली. बांधकामासाठी उपयुक्त असे खडकही महाराष्ट्रात आढळतात. पैकी बेसाल्ट सर्वत्र आढळतो. कोकणातील जिल्हे, तसेच कोल्हापूर, सातारा, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत जांभा आढळतो. चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ग्रॅनाइट व पट्टीताश्म; नागपूर, अमरावती व चंद्रपूर जिल्ह्यांत वालुकाश्म; भंडाऱ्यात क्वॉर्टसाइट आणि नागपूर जिल्ह्यात थोडा संगमरवर, हे खडक आढळतात. विटांची माती, वाळू, रेती, चुनखडी इ. बांधकामास उपयुक्त सामग्रीही सर्वत्र आढळते. यांशिवाय चिनी माती (केओलीन), लिथोमार्ज तसेच गेरू (काव), पिवडीसारखी रंगद्रव्ये व पांढरी मातीही बऱ्याच ठिकाणी आढळते. अभ्रकाच्या दृष्टीने कडवळ (सिंधुदुर्ग) येथील साठा महत्त्वाचा असून पूर्व विदर्भातही ते थोड्या प्रमाणात आढळते. टंगस्टन, तांबे, शिसे, जस्त, अँटिमनी इत्यादींची उपयुक्त खनिजे ; क्वॉर्ट्रझ, फेल्स्पार, बराइट तसेच बेसाल्टच्या पोकळ्यांत साचलेली कॅल्सेडोनी, अकीक, जमुनिया, ओपल यांसारखी उपरत्ने; कुरूविंद, गार्नेट, सोपस्टोन, फ्लिंट, चर्ट, ग्रॅफाइट, अँडॅल्यूसाइट, विविध प्रकारची झिओलाइटे इ. उपयुक्त खनिजेही महाराष्ट्रात आढळतात. यांपैकी काही खनिजेउच्चतापसह (उच्च तापमानाला न वितळता टिकून रहाणारे) व अपघर्षक (घासून वा खरवडून पृष्ठभाग गुळगुळीत करणारे) पदार्थ म्हणून आणि खतांसाठी उपयुक्त आहेत. शिवाय भंडाऱ्यातील अभ्रक, कायनाइट व सिलिमनाइटयुक्त   क्वॉर्ट्झाइटात  ०.५ टक्का व्हॅनेडियम, नागपूर जिल्ह्यातील काही मँगॅनीज धातुकांत गॅलियम आणि भंडाऱ्याच्या हिरवट अभ्रकात सिझियम ही दुर्मिळ मूलद्रव्ये थोड्या प्रमाणात आहेत. 

 किनारी भागात, विशेषतः  रायगड, ठाणे व मुंबईलगतच्या भागात मीठ बनविण्यात येते. खाण्याशिवाय रासायनिक उद्योगांत व खते बनवितानाही याचा वापर होतो. शिवाय रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिधुदुर्ग इ. जिल्ह्यांत आढळणाऱ्या उन्हाळ्यांतील (गरम झऱ्यांतील) खनिज जल हे काही रोगांवर उपयुक्त असल्याचे मानतात. 

bottom of page