top of page

महाराष्ट्र राज्य : भारतीय संघराज्यातील २9 राज्यां पैकी एक प्रमुख राज्य. क्षेत्रफळ ३,०७,७६२ चौ. किमी. लोकसंख्या  ६,२७,१५,३००(१९८१). क्षेत्रफळाच्या बाबतीत मध्य प्रदेश व राजस्थान राज्यांखालोखाल आणि लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश व बिहार या राज्याखालोखाल महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या ९.३७% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले असून लोकसंख्याही देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ९.१६% आहे. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १५° ४८' उ. ते २२° ६' उ. व ७२° ३६' पू. ते ८०° ५४' पू. यादरम्यान आहे. भारतीय द्वीपकल्पाचा बराच मोठा भाग महाराष्टाने व्यापलेला आहे. राज्याच्या पश्चिमेस अरबी   समुद्र, वायव्येस गुजरात राज्य आणि दाद्रा व नगरहवेली हा केंद्रशासित प्रदेश, उत्तरेस व पूर्वेस मध्य प्रदेश, अग्नेयीस आंध्र प्रदेश, दक्षिणेस कर्नाटक ही राज्ये व गोवा केंद्रशासित प्रदेश आहे. राज्याचा आकार अनियमित असला, तरी तो साधारणपणे काटकोन त्रिकोणी असल्याचे दिसते. पश्चिमेकडील उत्तर-दक्षिण असा ७२० किमी. लांबीचा समुद्रकिनारा म्हणजे काटकोन त्रिकोणाचा पाया असून येथून पूर्वेस ८०० किमी. अंतरावरील राज्याचे पूर्व टोक म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा शिरोबिंदू होय.

जिज्ञासू वाचकाला महाराष्ट्रासंबंधी अधिक माहिती विश्वकोशातील पुढी निर्देशिलेल्या विषयांच्या इतर नोंदींतूनही मिळू शकेल.

 (१) महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, जिल्ह्यांची प्रमुख ठिकाणे; तसेच ऐतिहासिक-राजकीय-सांस्कृतिक-औद्योगिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची स्थळे; कोकण, मराठवाडा, विदर्भ इ. विभाग; महत्त्वाच्या नद्या, पर्वत, शिखरे, सरोवरे, धरणे इत्यादी. 

(२) सातवाहन, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, मराठा इत्यादींच्या राजवटी; मराठ्यांची युद्धपद्धती, भोसले घराणे, पेशवे, खर्ड्याची लढाई यांसारखे इतिहासदृष्ट्या महत्त्वाचे विषय; छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक इ. महत्त्वाच्या व्यक्ती; मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, कोल्हापूर संस्थान, इतिहास-प्रसिद्ध किल्ले व पुरातत्त्वीय उत्खनन स्थळे (उदा., तेर, दायमाबाद, नेवासे इ.) इत्यादी.

(३) महाराष्ट्र राज्य शासनाचे महत्त्वाचे निगम किंवा महामंडळे; औद्योगिक क्षेत्रातील किर्लोस्कर घराणे; महत्त्वाचे प्रकल्प इत्यादी.  

(४) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आदिवासी जमाती; धार्मिक पंथोपपंथ, महत्त्वाचे सण, उत्सव, यात्रा, देवदेवता; सत्यशोधक समाज, प्रार्थनासमाज, मुस्लिम सत्यशोधक समाज इ. सामाजिक चळवळी. 

 (५) महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे; महत्त्वाच्या शैक्षणिक व संशोधनपर संस्था (गोखले अर्थशास्त्र संस्था, भांडारकर प्राच्याविद्या संशोधन मंदिर) इत्यादी.  

(६) याच खंडात ‘मराठी साहित्य’ या विषयावर स्वतंत्र विस्तृत नोंद आहे, त्यामुळे महाराष्ट्रावरील या नोंदीत हा विषय पुनरावृत्त करण्याचे टाळले आहे. कोकणी आणि हिंदी या भाषांतील महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती थोडक्यात दिली आहे. महाराष्ट्रातील भाषा हाही विषय थोडक्यात दिला आहे. महत्त्वाचे मराठी साहित्यिक, वैशिष्ट्यपूर्ण साहित्यप्रकार-उदा., पोवाडा, भारूड, लावणी, बखरमहानुभाव, वारकरी इ. महत्त्वाचे संप्रदाय, मराठी साहित्यसंमेलने इत्यादींवर अकारविल्हे स्वतंत्र नोंदी आहेत. 

 (७) नाट्यसंगीत, कीर्तन, भजन यांसारखे संगीतप्रकार; दख्खनी कला; अजिंठा, वेरूळ, कार्ले-भाजे इ. लेणी; हेमाडपंती वास्तुशैली; संगीत-नाट्य-चित्रपट क्षेत्रांतील प्रख्यात व्यक्ती; दशावतारी खेळ, तमाशा, बहुरूप खेळ इ. लोकरंजनप्रकार; प्रभात फिल्म कंपनी, महाराष्ट्र फिल्म कंपनी इ. चित्रपटसृष्टीतील संस्था.  

(८) मल्लखांब, लेझीम, कबड्डी, खोखो, गंजीफा इ. खेळांचे प्रकार, शिवछत्रपती पुरस्कार इत्यादी.  महाराष्ट्रासंबंधी सर्वांगीण माहिती मिळण्यासाठी प्रस्तुत नोंदीबरोबरच स्थूलमानाने वर दिग्दर्शित केलेल्या इतरही अनेक नोंदीचा अभ्यासू वाचकाला उपयोग होऊ शकेल. 

भूवैज्ञानिक इतिहास 

          भारतीय उपखंडाचे जे तीन प्राकृतिक विभाग आहेत, त्यांपैकी द्वीपकल्प ह्या विभागात महाराष्ट्र राज्य येते. साहजिकच भूवैज्ञानिक रचना, भूमिरूपविज्ञान (भूमिरुपांची वैशिष्ट्ये, उत्पत्ती व विकास ह्यांचे अध्ययन) व भूवैज्ञानिक इतिहास ह्या संबंधात भारतीय द्वीपकल्पाची असणारी सारी वैशिष्ट्ये महाराष्ट्रातसुद्धा दिसून येतात [⟶भारत (भूवैज्ञानिक इतिहास)]. तथापि महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा ज्वालामुखींपासून बनलेल्या बेसाल्टी लाव्ह्यांच्या थरांनी-काळ्या पत्थरांनी-व्यापलेला असून ते महाराष्ट्राचे खास भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आहे. निरनिराळ्या भूवैज्ञानिक कालखंडांमद्ये निर्माण झालेले खडक कोठे कोठे सापडतात व त्यांच्या अभ्यासातून कोणकोणते भूवैज्ञानिक निष्कर्ष निघतात, ह्याचा अभ्यास म्हणजेच एखाद्या भागाचा भूवैज्ञानिक इतिहास होय. आर्कीयन (आर्ष) महाकल्पात तयार झालेले खडक महाराष्ट्रात फारच थोड्या क्षेत्रात सापडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडील अगदी थोडासा भाग ह्या महाकल्पात निर्माण झालेल्या खडकांनी व्यापलेले असून नागपूर−भंडारा जिल्ह्यांमध्येही काही भागांत आर्कीयन काळातील खडक सापडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडणारे खडक हे धारवाडी संघाच्या गोव्यामध्ये आढळणाऱ्या कॅसलरॉक पट्ट्याचे उत्तरेकडील टोक असूनअलीकडेच त्यांना ‘बांदा माला’ असे नाव देण्यात आले आहे, तर विदर्भातील नागपूर-भंडारा भागामध्ये सापडणारे खडक मध्य प्रदेशातील चिल्पी घाट पट्ट्याचा पश्चिमेकडील विस्तार आहे. याचे महाराष्ट्रामध्ये आल्यावर विभाजन होते व नागपूरकडील पट्ट्यास ‘सौसर माला’, तर भंडाऱ्याकडील पट्ट्यास ‘साकोली माला’ असे नाव आहे. बांदा, सौसर आणि साकोली या मालांमध्ये रुपांतरित (दाब व तापमान यांमुळे बदल घडून आलेले) खडक सापडतात. यांमध्ये मुख्यत्वेकरून फायलाइट, क्वॉर्ट्झाइट, अभ्रकी सुमाजा (सहज भंगणारा खडक) इ. खडकांचा समावेश आहे. मुळातले अवसादी (गाळाचे) खडक सागरी क्षेत्रात तयार झालेले असल्याने आर्कीयन कालखंडातील सागरी क्षेत्राचा विस्तार कोठपर्यंत झाला असावा, ही कल्पना येण्यास ह्या खडकांचा उपयोग होतो. या खडकांची निर्मिती होताना भूकवच आजच्याइतके जाड नव्हते त्यामुळे ह्या अवसादी खडकांमध्ये अनेक वेळा लाव्ह्याचे अंतःस्तरण झाले (थरांमध्ये थर तयार झाले). अवसादी खडकांचे रूपांतर होताना लाव्ह्यापासून निर्माण झालेल्या खडकांचेही रूपांतरण होऊन मेटॅडोलेराइट, अँफिबोलाइट इ. खडकांची निर्मिती झाली. हे खडक शेवटी गिरिजनक (पर्वतनिर्मितीच्या) हालचालींमुळे उचलले जाऊन त्यांचे घड्यांचे पर्वत बनले व त्यांचे सागरी क्षेत्रातून जमिनीत परिवर्तन झाले; पण ह्याचमुळे त्यांची रचना अतिशय गुंतागुंतीची झाली व त्यांत शिलारसाची अंतर्वेशने (घुसण्याच्या क्रिया) होऊन ग्रॅनाइट, गॅब्रो इ. अग्नज खडकांची निर्मिती झाली. बांदा, सौसर व साकोली मालांमधील खडकांमध्ये लोह व मँगॅनीज ह्यांच्या धातुकांचे (कच्च्या रुपातील धातूंचे) साठे सापडतात.

 

[⟶आर्कीयन; धारवाडी संघ]. 

 यवतमाळ जिल्ह्याच्या आग्नेय भागात व नांदेड जिल्ह्याच्या पूर्व भागामध्येही ह्याच कालखंडामध्ये तयार झालेले ग्रॅनाइट व पट्टिताश्म अस्तित्वात आहेत.  

सुपुराकल्पामध्ये [आर्कीयननंतर ते सु. ६० कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळामध्ये; ⟶ अल्गाँक्वियन] तयार झालेले खडकही असेच अगदी फार लहान क्षेत्रात आढळतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी भागात व फोंडा घाट भागात पिंडाश्म, वालुकाश्म, शेल इ. खडकांनी बनलेला भाग आहे. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात आढळणाऱ्या कलादगी मालेचेच हे भाग आहेत. असे मानतात. आंध्र प्रदेशातील ⇨कडप्पा संघाचे हे खडक समतुल्य आहेत. ह्यांचेच समतुल्य खडक म्हणजे आंध्र प्रदेशातील पाखाल मालेचे खडक होत. पाखाल मालेच्या खडकांपैकी काहींनी आंध्र प्रदेशालगतच्या सिरोंचा भागातील थोडे क्षेत्र व्यापले आहे. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांत अगदी लहान क्षेत्रात चुनखडी, वालुकाश्म, शेल इ. खडकांनी5 बनलेल्या शैलसमूहास ‘सुलावाई माला’ असे नामाभिधान आहे. ही माला सुपुराकल्पातील पण ⇨विंध्य संघाशी समतुल्य आहे, असे मानतात; पण हेही खडक पाखाल मालेतीलच असावेत, असा तर्क काही भूवैज्ञानिकांनी अलीकडच्या काळामध्ये केला आहे. 

 पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या कालाच्या) फार मोठ्या कालखंडामध्ये भारतीय द्वीपकल्पामध्ये खडकांची निर्मिती फारशी झालीच नाही, असे म्हटले तरी चालेल. पर्मियन (सु. २७ ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या) कालखंडाच्या सुरुवातीला एक फार मोठे हिमयुग होऊन गेले व त्या वेळच्या हिमनद्यांच्या तोंडाशी हिमानी अवसाद (गाळ) सापडतात. त्यांचे दृश्यांश (भूपृष्ठावर उघडे पडलेले भाग) इतरत्र खूप असले, तरी महाराष्ट्रात त्यांचा आढळ केवळ कामठी कोळसा क्षेत्राच्या परिसरातील फक्त तीन छोट्या दृश्यांशांच्या रुपात अपवादात्मक रीतीनेच होतो.

          ह्या हिमानीअवसादांच्या निर्मितीनंतर काही विशिष्ट क्षेत्रात खचदऱ्या [खंदकासारख्या आकाराच्या दऱ्या; खचदरी] निर्माण होऊन त्यांत नादेय व सरोवरी (नदीमुळे व सरोवरात बनलेल्या) अवसादांचे शैलसमूह तयार झाले. हिमानी अवसाद व त्यानंतर येणारे हे नादेय आणि सरोवी अवसाद ह्यांच्या शैलसमूहास ⇨गोंडवनी संघ असे नाव आहे. गोंडवनी संघाची कालमर्यादा बरीच मोठी म्हणजे पर्मियनपासून पूर्व क्रिटेशसपर्यंत (सु. २७ ते १४ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) आहे. गोंडवनी संघाचे खडक महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत असून त्यांमध्ये दगडी कोळशांचे साठे सापडतात. 

 मध्यजीव महाकल्पातील (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) क्रिटेशस कालखंड हा सागरी अतिक्रमणांचा कालखंड म्हणून प्रसिद्ध आहे. नर्मदा नदीच्या खोऱ्यात मध्य प्रदेश व गुजरात ह्या राज्यांत नर्मदेच्या उत्तरेस अशा अतिक्रमणांमुळे तयार झालेले सागरी खडक सापडतात व त्यास ⇨बाघ थर म्हणतात. बाघ थरांचे काही दृश्यांश नर्मदा नदीच्या दक्षिणेस धुळे जिल्ह्यातील अक्कलकुआ भागामध्ये सापडतात. 

          बाघ थरांच्या निर्मितीनंतरपरंतु क्रिटेशस कालखंडामध्येच विदर्भ आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या भागामध्ये विस्तृत अशा सपाट, मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली व तेथे गोड्या पाण्यातील वालुकामय चुनखडकांची निर्मिती झाली. हे चुनखडक महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथे आढळतात व त्यांना ⇨लॅमटा माला म्हणतात. लॅमेटा मालेच्या खडकांमध्ये जबलपूर व पिसदुरा (जि. चंद्रपूर) येथे सापडणाऱ्या डायनोसॉर या प्रचंड सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जीवाश्मांचे (शिळारूप अवशेषांचे) साम्य ब्राझील व मॅलॅगॅसी येथे सापडणाऱ्या तत्कालीन खडकांच्या जीवाश्मांशी असल्याने ⇨खंडविप्लषाच्या कल्पनेस पुष्टी मिळते. लॅमेटा मालेतील खडकांचे दृश्यांश मात्र त्यावर येणाऱ्या दक्षिण ट्रॅपच्या भूभागाच्या सीमेपुरते मर्यादित आहेत. 

          मध्यजीव महाकल्पाच्या शेवटी शेवटी द्वीपकल्पातील जमिनीस लांबच लांब अशा भेगा पडून त्यांमधून बेसाल्टी लाव्ह्यांची उद्गिरणे झाली. लाव्ह्यांचे हे थर बहुधा क्षितिजसमांतर आहेत. पायऱ्या−पायऱ्यांप्रमाणे दिसणाऱ्या या खडकांना स्विडीश ट्रॅपन या शब्दावरून ट्रॅप हे नाव पडले आहे व हे भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडे सापडतात म्हणून त्यांना ⇨दक्षिण ट्रॅप अशी संज्ञा आहे. ह्याच थरांमध्ये कोठे कोठे अंतःस्तरित असे गोड्या पाण्यातील अवसादी खडक सापडतात. त्यांस ⇨अंतरा-ट्रॅपी थर असे म्हणतात. महाराष्ट्रात असे थर विदर्भात (टाकळी, नागपूरमधील सिताबर्डी टेकडी) व मुंबई शहरात आढळतात. या थरांमध्ये गोड्या पाण्यातील जीवसृष्टीचे अवशेष आढळतात. विदर्भातील अंतरा-ट्रॅपी थर हे क्रिटेशस कालखंडातील असून मुंबईतील अंतरा-ट्रॅपी थर पॅलिओसीन (सु. ६.५ ते ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालातील आहेत. असे त्यांत आढळणाऱ्या जीवाश्मांवरून वाटते. त्यामुळे मध्यजीव महाकल्पाच्या शेवटी शेवटी सुरू झालेला भूवैज्ञानिक इतिहासातील हा लाव्ह्यांच्या उद्गिरणांचा अध्याय नवजीव महाकल्पाच्या  (गेल्या सु. ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) आरंभीच्या काळापर्यंत सुरूच होता, असे म्हटले पाहिजे. 

          या काळाच्या शेवटी भारतीय द्वीपकल्पाच्या हवामानामध्ये झालेला बदल जांभ्या दगडांच्या निर्मितीस पोषक ठरला. जांभा दगड कोकण पट्टीत सर्वत्र, सातारा व कोल्हापूर ह्या जिल्ह्यांच्या पश्चिम भागांत विपुल सापडतो. [⟶जांभा−२].

          महाराष्ट्रात अभिनव (गेल्या सु. ११ हजार वर्षांच्या) कालखंडामध्ये तापी, गोदावरी, पैनगंगा, वैनगंगा इ. नद्या व त्यांच्या काही उपनद्यांच्या पात्रांच्या दोन्ही बाजूंस जलोढाने (गाळाने) तयारझालेली जमीन आहे. ह्याच कालखंडामध्ये सागर किनारा उचलला गेल्याने कोकण किनाऱ्यावर सागरी चुनखडकांची निर्मिती झाली. चुनखडकाच्या या थरांची जाडी फारच कमी (५ मी. पेक्षाही कमी) आहे. ह्या चुनखडकांस कोकणातील लोक ‘करळ’ असे म्हणतात. 

भूवर्णन 

 प्राकृतिक दृष्ट्या महाराष्ट्राचे प्रमुख तीन विभाग पडतात : (१) पश्चिमेकडील कोकणची किनारपट्टी, (२) सह्याद्रीच्या रांगा व (३) पूर्वेकडील पठारी प्रदेश. 

 (१) पश्चिमेकडील कोकणची किनारपट्टी : उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल खाडीपर्यंतच्या चिंचोळ्या व सपाट भूप्रदेशाला कोकण असे म्हणतात. कोकणपट्टीचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग केले जातात. या किनारपट्टीच्या पश्चिमेस अरबी समुद्र, तर पूर्वेस सह्याद्रीची रांग आहे. किनारपट्टीची एकूण दक्षिणोत्तर लांबी ७२० किमी. व रुं दी ४० ते ८० किमी. आहे. उत्तरेकडे उल्हास नदीच्या खोऱ्यात रुंदी सर्वात जास्त म्हणजे १०० किमी. पर्यंत आहे. दक्षिणेकडे मात्र रुं दी कमी होत जाते. सह्याद्रीच्या रांगेमुळे कोकणपट्टीची रुंदी मर्यादित झाली आहे. हा भाग सपाट नसून बराचसा उंचसखल व खडबडीत आहे. सह्याद्रीच्या तीव्र उतावरून द्रुतगतीने वाहत येणाऱ्या नद्यांनी किनारपट्टीवर खोल चर पाडलेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर झीज झालेल्या उभ्या आडव्या डोंगररांगांनी हा प्रदेश व्यापलेला आहे.  

कोकणच्या किनारपट्टीची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत असून ती साधारणपणे १५ मी. पासून २७५ मी. पर्यंत आढळते. अगदी पश्चिमेकडील अरबी समुद्रलगतच्या सखल भागाची सस. पासून उंची फारच कमी असून या भागाला ‘खलाटी’ असे म्हणतात. तेथून पूर्वेकडील डोंगराळ भागाला ‘वलाटी’ असे म्हणतात. यानंतर सह्याद्रीच्या रांगेची सुरुवात होऊन त्याची उंची द्रुतगतीने वाढत जात असलेली दिसते. किनारपट्टीवर काही ठिकाणी कमी उंचीचे व जांभा खडकांचे पठारी भाग, तर नदीमुखांच्या प्रदेशात मैदाने आढळतात (किनारपट्टीचा, विशेषतः दक्षिणेकडील, भाग जांभ्या मृदेने व्यापला असून तेथे सस. पासून सरासरी७५ मी. उंचीचे पठारी भाग आढळतात). किनाऱ्यालगत मुरुड, जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांसारखे जलदुर्ग आहेत. कमी उंचीचे भाग नद्यांच्या गाळाने भरून आलेले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर लहानमोठी बरीच बंदरे असून फार पूर्वीपासून व्यापाराच्या दृष्टीने ही बंदरे प्रसिद्ध आहेत. प्राचीन व मध्ययुगीन काळातही येथून अरबस्तान, ईजिप्त, ग्रीस, रोम यांच्याशी व्यापार चाले. 

 (२) सह्याद्रीच्या रांगा : महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील ही ⇨सह्याद्रीची रांग कोकणच्या किनारपट्टीला जवळजवळ समांतर अशी उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. तिला पश्चिम घाट असेही म्हणतात. राज्याच्या उत्तर सीमेपासून ते दक्षिणेस राज्याच्या सीमा ओलांडून कर्नाटक, केरळपर्यंत सह्याद्रीच्या रांगा पसरलेल्या आढळतात. सह्याद्रीमुळेच महाराष्ट्राचे कोकण व देश (पश्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग निर्माण झाले असून कोकण व पठारावरील नद्यांच्या हाच प्रमुख जलविभाजक आहे. पर्वताच्या उभय बाजूंना भूरचनेची दोन भिन्न स्वरूपे आहेत. पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकांच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. अधूनमधून झीज होऊन निर्माण झालेले उघडे व वनाच्छादित असे पर्वतांचे अवशिष्ट उतारही पहावयास मिळतात. या पश्चिम उतारावर नद्यांनी खोल दऱ्यातयार केल्या आहेत. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याकडे कोकणची किनारपट्टीआहे. पर्वताचा पूर्व उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन होतो.   सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेकडे अनेक फाटे फुटलेले असून त्यांतील उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे ⇨सातमाळा−अजिंठा डोंगररांगा, हरिश्चंदगड, ⇨बालाघाटडोंगररांगा व महादेवाचे डोंगर प्रमुख आहेत. पठारावरील नद्यांचे हे दुय्यम जलविभाजक ठरतात. सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक व दक्षिणेकडे कमी आढळते. सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट या प्रदेशात आहेत; त्यांवरून याला घाटमाथा असे म्हटले जात असावे. भीमाशंकर, महाबळेश्वर, पाचगणी यांसारखी स्थळे अशाच भागावर आहेत. सह्याद्री व त्याच्या निरनिराळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले अनेक डोंगरी किल्ले आहेत. नासिक-अहमदनगर जिल्हांच्या सीमेवर असलेले ⇨कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर (उंची १,६४६ मी.) आहे. याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), महाबळेश्वर (१,४३८ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही सह्याद्रीतील इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत.  सह्याद्री श्रेणी बरीचशी सलग असली, तरी तीमध्ये अधूनमधून खिंडी किंवा ⇨घाटही असलेले आढळतात. थळ, माळशेज, बोर, वरंधा, आंबेनळी, कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा , आंबोली इ. घाटांनी देश व कोकण एकमेकांना जोडले आहेत. या दोन प्रदेशांतील वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने या घाटांना पूर्वीपासून महत्त्व आहे. मुंबई-नासिक महामार्गावरील कसारा येथील थळघाट व मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळ्याजवळील बोरघाट यांद्वारे महाराष्ट्राचा पूर्व भाग मुंबईशी रस्ते व लोहमार्गाने जोडला गेला आहे. 

 

(३) पूर्वेकडील पठारी प्रदेश : सह्याद्रीच्या पूर्वेस विस्तृत असा पठारी प्रदेश पसरलेला असून त्याला देश म्हणूनही ओळखले जाते. राज्याच्या जवळजवळ नऊ-दशांश भाग या पठाराखाली मोडतो. दख्खनच्या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्रात येत असून त्याला महाराष्ट्र पठार असेही संबोधले जाते. पश्चिमेस सह्याद्रीच्या पूर्व उतारापासून ते विदर्भाच्या अगदी पूर्व भागातील सूरजगड, भामरागड व चिरोली टेकड्यांपर्यंत सु. ७५० किमी. व उत्तरेकडील सातपुडा पर्वतापासून दक्षिणेस कोल्हापूर जिल्हापर्यंत सु. ७०० किमी. पर्यंत महाराष्ट्राचे पठार पसरले आहे. मुंबईसभोवतालच्या भागात या पठाराची जाडी अधिक आहे. पठाराची पश्चिम बाजू काहीशी उंचावलेली असून प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे व आग्नेयीस बंगालच्या उपसागराकडे असलेला दिसतो. पश्चिमेकडील सरासरी उंची ६०० मी. असून पूर्वेकडे वैनगंगा खोऱ्यात ती ३०० मी. पर्यंत कमी होत गेलेली आढळते. 

 महाराष्ट्राच्या पठारावर ठिकठिकाणी भूमिस्वरूपांची स्थानिक वैशिष्ट्ये आढळतात. पठारावर सह्याद्रीच्या अनेक रांगा पसरलेल्या आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अनुक्रमे ⇨सातपुडा पर्वत, तापी−पूर्णेचे खोरे, सातमाळा−अजिंठा डोंगररांगा, गोदावरी खोरे, हरिश्चंद्रगड, बालाघाट डोंगररांगा, भीमा खोरे, महादेवाचे डोंगर व शेवटी दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे अशी या पठारी प्रदेशाची भूरचना आहे. पूर्वेकडे पसरलेल्या डोंगरफाट्यांचे प्रारंभ सह्याद्रीत होत असून त्या पश्चिम वायव्येकडून पूर्व आग्नेयीकडे पसरलेल्या आहेत. यांचे उत्तर उतार तीव्र व दक्षिण उतार मंद आहेत. तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा या नदीखोऱ्यांनी ह्या डोंगररांगा एकमेकींपासून अलग केलेल्या आहेत. हा संपूर्ण प्रदेश लाव्हारसापासून तयारझालेल्या अग्निजन्य बेसाल्ट खडकांनी बनलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्हे याच पठारी प्रदेशात येतात. पठारावर सपाट माथ्याचे डोंगर व टेकड्या हे भूविशेष आढळतात. डोंगरांच्या मुख्य रांगांना किंवा अन्य भूमिस्वरूपांना त्या त्या भागात स्थानिक नामाभिधाने देण्यात आली आहेत. 

महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर सातपुडा पर्वतश्रेणी व तिच्या दक्षिणेस तापी−पूर्णा खोरे असून काही वेळा हा एक स्वतंत्र प्राकृतिक विभाग मानला जातो. सातपुड्याच्या धुळे जिल्ह्यातील डोंगररांगांना तोरणमाळचे डोंगर असे संबोधले जात असून येथील तोरणमाळ शिखराची उंची १, ०३६ मी. आहे. तसेच अमरावती जिल्हातील डोंगररांगांना गाविलगड टेकड्या, मेळघाट डोंगररांगा असे म्हणतात. बैराट (१,१७७ मी.) हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर तसेच चिखलदरा (१,११५ मी.) हे थंड हवेचे ठिकाण याच डोंगररांगांत आहे. 

 विदर्भाच्या पूर्वेकडील सीमाप्रदेशातील भूमिस्वरूपात विविधता आढळते. तेथे आर्द्र हवामानाच्या परिणामांमुळे झिजलेले ग्रॅनाइटी, चुनखडी व तत्सम खडक भूपृष्ठावर डोकावताना दिसतात व त्यामुळे अनियमित आकाराच्या सुळक्यांसारख्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत. प्रसिद्ध रामटेक टेकडी (४०० मी.) हा या भागातील प्रातिनिधिक भूविशेष आहे. विदर्भात चिरोली, चिमूर, नवेगाव, भामरागड अशा लहानमोठ्या टेकड्या आढळतात. 

 नद्या : महाराष्ट्र राज्याच्या विशिष्ट प्राकृतिक रचनेमुळे पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी अशा दोन नदीप्रणाल्या स्पष्टपणे दिसतात. कोकणातील नद्या व पठारावरील नद्या अशीही विभागणी करता येते. पश्चिमवाहिनी नद्या अरबी समुद्राला, तर पूर्ववाहिनी नद्या काहीशा पूर्वेस अगर आग्नेयीस वाहत जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर बंगालच्या उपसागराला मिळतात. बहुतेक नद्या सह्याद्रीच्या रांगेत ५०० ते ७०० मी. उंचीच्या भागात उगम पावत असून सह्याद्री हा राज्यातील प्रमुख जलविभाजक आहे. याशिवाय सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगररांगा व उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांग यांमध्येही काही नद्या उगम पावत असून त्यांना दुय्यम जलविभाजक म्हणता येईल.  

 पश्चिमवाहिनी नद्यांमध्ये महाराष्ट्रात ⇨तापी ही सर्वांत लांब व प्रमुख नदी आहे. ⇨पूर्णा नदी  ही तापीची प्रमुख उपनदी असून तापी-पूर्णेचे खोरे प्रसिद्ध आहे. हे खोरे महाराष्ट्राच्या उत्तर भागात असून त्याने खानदेशाची भूमी सुपीक केली आहे. ⇨गिरणाव ⇨पांझरा नदीह्या तापीच्या इतर उपनद्या आहेत. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी २०८ किमी. व जलवाहनक्षेत्र सु. ३१,३६० चौ. किमी. आहे. तापी-पूर्णा खोऱ्याचा दक्षिण भाग अधिक सपाट व सुपीक, तर उत्तर भाग वालुकामय व ओबडधोबड आहे 

 तापी खोऱ्याच्या उत्तरेस नर्मदा नदीचे खोरे असून ती महाराष्ट्राच्या धुळे जिल्हाच्या उत्तर सीमेवरून सु. ५४ किमी. अंतर वाहते. नर्मदेचे फारच कमी जलवाहनक्षेत्र महाराष्ट्रात आहे. तापी व नर्मदा या दोन्ही नद्यांच्या मुखाचा प्रदेश गुजरात राज्यात असून उगम मध्य प्रदेश राज्यात आहे. 

 कोकणातील पश्चिमवाहिनी नद्या सह्याद्रीत उगम पावून १०० ते १५० किमी. पश्चिमेस प्रवास करून अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोकणची किनारपट्टी अरुं द असल्याने येथील बऱ्याच नद्यांची लांबी ८० किमी. पेक्षाही कमी आहे.  दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल इ. कोकणातील नद्या आहेत. वैतरणा व उल्हास नद्या तुलनेने अधिक लांब आहेत. बोरघाटात उगम पावणारी उल्हास नदी (लांबी १३० किमी.) साष्टी बेटाच्या थोड्या उत्तरेस वसईखाडीत अरबी समुद्राला मिळते. कोकणातील नद्यांच्या मुखांशी खाड्यांची निर्मिती झालेली आढळते. काहींच्या मुखांशी वाळूचे दांडे आढळतात. वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर, विजयदुर्ग, तेरेखोल या ठिकाणी अशा खाड्या आढळतात. कोकणातील नद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, तर उन्हाळ्यात त्या कोरड्या असतात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या या नद्या विशेष उपयुक्त नाहीत. या नद्यांमुळे सह्याद्रीचा पश्चिम उतार विदीर्ण झाला आहे. 

 पठारावरील पूर्ववाहिनी नद्यांमध्ये गोदावरी नदी, ⇨भीमा नदीव ⇨कृष्णा नदीह्या प्रमुख नद्या आहेत. यांना आर्थिक तसेच धार्मिक-सांस्कृतिक दृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. यांपैकी गोदावरी ही सर्वाधिक लांबीची नदी नासिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी ६६८ किमी. व जलवाहनक्षेत्र ७८,५६४ चौ. किमी. आहे. दारणा, प्रवरा, सिंदफणा, पूर्णा, प्राणहिता, ⇨मांजरा नदी, दुधना नदी व इंद्रावती ह्या गोदावरीच्या मुख्य उपनद्या आहेत. तापी व गोदावरी यांची खोरी सातमाळा−अजिंठा डोंगररांगांनी एकमेकींपासून अलग केलेली आहेत. 

गोदावरीच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे असून ही दोन खोरी हरिश्चंद्रगड−बालाघाट डोंगररांगांनी एकमेकींपासून विभागली आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे भीमेचा उगम होतो. भीमा ही कृष्णेची उपनदी असली, तरी ती महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर कृष्णेला मिळते, त्यामुळे महाराष्ट्रात या नद्यांची वेगवेगळी खोरी आहेत. कर्नाटक-आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर भीमा कृष्णेला मिळते. भीमेची महाराष्ट्रातील लांबी ४५१ किमी. व जलवाहनक्षेत्र ४६,१८४ चौ. किमी. आहे. कुकडी, घोड, भामा, पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा, गुंजवणी, येळवंडी, नीरा नदी, कऱ्हा, सीना, माण ह्या भीमेच्या उपनद्या आहेत. 

भीमेच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे असून ही दोन्ही खोरी महादेव डोंगररांगांनी एकमेकींपासून वेगळी केली आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कृष्णा नदी उगम पावते. महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या वेण्णा, कोयना तसेच वारणा, वेरळा, ⇨पंचगंगा ह्या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर ती कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतून पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णेची राज्यातील लांबी २८२ किमी. व जलवाहनक्षेत्र २४,६८२ चौ. किमी. आहे. 

महाराष्ट्राच्या पूर्व भागातीलविदर्भातील−नद्या दक्षिणवाहिनी असून त्यांची एक स्वतंत्र नदीप्रणाली असलेली दिसते. ⇨वर्धा नदी व ⇨वैनगंगा नदी ह्या विदर्भातील प्रमुख दक्षिणवाहिनी नद्या आहेत. या दोन्ही नद्यांचा उगम महाराष्ट्राच्या बाहेर उत्तरेस मध्ये प्रदेश राज्यात आहे. वर्धा-वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे संबोधले जाते. ⇨वैनगंगा ही वर्धा नदीची पश्चिमेकडून येऊन मिळणारी प्रमुख उपनदी आहे. उंचसखल भूभागातून वहाणाऱ्या वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी ४५५ किमी. व जलवाहनक्षेत्र ४६,१८२ चौ. किमी. आहे; तर वैनगंगा नदीची महाराष्ट्रातील लांबी २९५ किमी. व जलवाहनक्षेत्र ३७,९८८ चौ. किमी. आहे. 

 कोकण व पठारावरील नद्यांमध्ये भूरचनेच्या फरकामुळे काही वैशिष्ट्ये आढळतात. कोकणातील नद्या लांबीने कमी, शीघ्रवाही, अरूं द व खोल दऱ्यांतून वाहणाऱ्या, उथळ मुख्यप्रदेश असलेल्या; तर पठारावरील नद्या त्यांच्या तुलनेने लांबीने अधिक, कमी वेगवान, रुंद व उथळ दऱ्यांतून वाहणाऱ्या आहेत. कोकणातील नद्यांचे बरेचसे पाणी वाया जाते; तर पठारावरील नद्यांच्या पाण्याच्या बराचसा उपयोग जलसिंचन व जलविद्युत्निर्मितीसाठी करून घेतला जात आहे. मात्रदोन्ही प्रदेशातील नद्यांना नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात भरपूर पाणी असते. 

 महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांत लहानमोठे नैसर्गिक वा कृत्रिम तलाव आढळतात. विशेषतः विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत तलावांची संख्या खूपच आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यातच सु. १५,००० तलाव आहेत. त्यामुळे विदर्भातील या भागाला तलावांचा प्रदेश असे म्हणतात. सह्याद्रीच्या उतारावर अनेक लहानमोठे गरम पाण्याचे झरे आहेत. उदा. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी, राजापूर-खेडजवळील गंगा, रायगड जिल्ह्यातील पाली (उन्हेरे) इत्यादी

मृदा 

  महाराष्ट्रातील जमिनी प्रामुख्याने ऑजाइट, बेसाल्ट, ग्रॅनाइट व पट्टिताश्म यांसारख्या खडकांपासून तयार झालेल्या आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांत बेसाल्ट खडकांत बदल होऊन जेथे जांभ्याचा खडक तयार झालेला आहे, तेथे जांभ्याच्या जमिनी तयार झालेल्या आहेत.  भूपृष्ठातील चढउतार, खडकांच्या स्वरूपातील फरक, वार्षिक पर्जन्यमानातील फरक (५० सेंमी. ते ५०० सेंमी.) व नैसर्गिक वनस्पती (वनश्री) समूहातील फरक यांमुळे महाराष्ट्रातील मृदा प्रामुख्याने सात गटांत विभागल्या जातात. या मृदांची काही वैशिष्ट्ये खाली थोडक्यात दिली आहेत. 

(१) लवणयुक्त व गाळाच्या जमिनी : पश्चिम किनापट्टीत या जमिनी आढळतात. या काळ्या पत्थरापासूनच निर्माण झालेल्या असून जेथे जेथे त्या समुद्रकिनाऱ्याला अगदी लागून आहे तेथे तेथे समुद्राचे पाणी आत घुसत असल्याने जमिनीतील लवणांचे प्रमाण वाढून त्या लवणयुक्त बनतात. त्यांनाच कोकणात ‘खार जमिनी’ या नावाने संबोधिले जाते. किनारपट्टीपासून जसजसे दूर जावे तसतसे खार जमिनीऐवजी गाळाच्या जलोढ जमिनीचे प्रमाण वाढत जाते. या जमिनी कमीअधिक खोलीच्या असून त्यांची उत्पादनक्षमता खूपचकमी असते. खार जमिनीतील लवणांमुळे व गाळांच्या जमिनीत भूपृष्ठातील चढउतारामुळे जमिनीचा विकास जेवढा व्हावयास पाहिजे तेवढा झालेला नाही. या जमिनीत सध्या तरी भात हेच प्रमुख पीक घेतले जाते. 

(२) जांभ्याच्या, जांभ्यासारख्या व तांबड्या जमिनी : जंगलातील विशिष्ट स्वरूपाची वनश्री व उष्ण आर्द्र हवामान यांमुळे बेसाल्ट या खडकामध्ये बदल होताना त्यापासून जांभ्याच्या व जांभ्यासारख्या जमिनी तयार होतात. या जमिनी प्रामुख्याने रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हे तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, नासिक व पुणे या जिल्ह्यांचा पश्चिम भाग यांत आढळतात. या जमिनी साधारणपणे अम्ल स्वरूपाच्या असतात व त्यात चुनखडी अजिबात आढळत नाही. जमिनीची उत्पादनक्षमता मध्यम ते कमी असते. फॉस्फेट व पोटॅश यांचा पुरवठा खूपच कमी असतो. वनश्री व हवामान या दोन घटकांचा जांभ्याच्या जमिनीवर विशेष परिणाम दिसून येतो.   तांबड्या जमिनी प्रामुख्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आढळतात व त्यांची उत्पत्ती मिश्र खडकापासून होते. या जमिनींच्या बाबतीतही वनश्री व उष्ण आर्द्र हवामान यांचा संयुक्तपणे परिणाम होतो. जांभ्याच्या जमिनी असलेल्या भागात २०० ते ३०० सेंमी. वार्षिक पाऊस पडत असल्याने ह्या जमिनीत भात, नागली व फळझाडांची पिके प्रामुख्याने घेतात. जांभ्यासारख्या जमिनी असलेल्या भागातही पावसाचे वार्षिक प्रमाण २०० ते ३०० सेंमी. असते; पण या जमिनीत खरीप हंगामात भात व नागली आणि रबी हंगामात वाटाणा, घेवडा अशी पिके घेतात. ठाणे, रायगड व नासिक या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात जांभ्यासारख्या जमिनीचे प्रमाण जास्त आहे. 

 (३) वरड जमिनी व दरीतील चिकण दुमट जमिनी : या जमिनी बेसाल्ट खडकापासूनच झालेल्या आहेत; पण त्या मात्र डोंगरी प्रदेशात घाटमाथ्यावर आढळतात, तर चिकण दुमट जमिनी दरीच्या प्रदेशात आढळतात. चढ उतारातील फरकाप्रमाणे या जमिनी ३ ते ४ सेंमी. खोलीपासून १ ते १.५ मी. खोलीच्या आढळतात. जास्त पावसाच्या प्रदेशातच या जमिनी आढळत असल्याने जमिनीतील विनिमय घटक द्रव्यांचे प्रमाण बरेच कमी असते व त्यांचे pH मूल्य ६.५ ते ७.५ या दरम्यान आढळते [⟶पीएच मूल्य]. उतार फार असलेल्या भागातील जमिनींना ‘कुमारीस’ असे म्हणतात व त्यांत नाचणीसारखी पिके व गवत घेतात. चिकण दुमट जमिनी सुपीक असल्याने त्यांत भाताचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. या जमिनीचा पोत व pH मूल्य सर्वसाधारणपणे स्थिर असतात. 

 (४) मध्यम व जास्त खोलीच्या काळ्या जमिनी : महाराष्ट्रातील जमिनीचे जास्तीत जास्त क्षेत्र या प्रकाराखाली मोडते. मध्यम काळ्या जमिनीत चुनखडीचे व विनीमय घटक द्रव्यांचे प्रमाण भरपूर व जमिनीचे pH मूल्य ८ ते ८.५ च्या पुढे असते. या जमिनीत फॉस्फेट व पोटॅशचे प्रमाण साधारणपणे समाधानकारक असले, तरी सेंद्रिय कार्बनाचे व नायट्रोजनाचे प्रमाण मात्र खूपच कमी असते. जमिनीची प्रत्यक्ष खोली व तिचा पोत याबाबतींत खूपच विविधता आढळते. जास्त खोलीच्या काळ्या जमिनी या मोठ्या नद्यांवरील पाणलोट भागांत व असंख्य लहान पाणवठ्याच्या भागातील तिरावर आढळतात. या बहुसंख्य जमिनी जलोढ आहेत. या खूप खोल व अत्यंत सुपीक आहेत.  तापी, भीमा, कोयना, गोदावरी, प्रवरा, नीरा, कृष्णा यांसारख्या मोठ्या नद्यांच्या खोऱ्यांत या जमिनीचे प्रमाण जास्त आहे. जमिनीच्या सुपीकतेमुळे त्यांच्यात सर्व बागायती पिके उत्तम तऱ्हेची येतात. उशिरा पडणारा पाऊस जेव्हा अनुकूल असेल तेव्हा गव्हाचे व रबी ज्वारीचे उत्कृष्ट पीक काढले जाते. मध्यम व खूप खोलीच्या काळ्या जमिनींच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात फारसाफरक नाही. पावसाच्या प्रमाणाप्रमाणे ज्वारी आणि गव्हाबरोबरच द्विदल धान्ये, कापूस, भुईमूग, निरनिराळी कडधान्ये, गळिताची पिके यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ऊस, द्राक्षे या नगदी पिकांसाठीही या जमिनी प्रसिद्ध आहेत. या भागात ६० ते ७५ सेंमी. एवढाच पाऊस पडत असल्याने सिंचन व्यवस्थेला शेतीत विशेष महत्त्व दिले जाते. 

 (५) वरड ग्रॅव्हली जमिनी : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील डोंगराळ प्रदेशात या जमिनी प्रामुख्याने आढळतात. स्थानिक भाषेत त्यांना वरडी, रेटरी इ. नावांनी संबोधितात.  जमिनीची सुपिकता फार कमी असल्याने त्यांच्यात नाचणीसारखी पिकेच फक्त येऊ शकतात. 

 (६) उथळ व चिकण दुमट जमिनी : भंडारा जिल्ह्यातील जवळजवळ ७० टक्के जमीन मिश्र खडकापासून तयार झालेली असून ती उथळ व चिकण दुमट स्वरूपाची आहे. बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या काळ्या जमिनीप्रमाणेच या जमिनीचे गुणधर्म आढळून येतात. पावसाचे प्रमाण निश्चित असल्याने खरीप हंगामात भात व खोल जमिनीत रबी हंगामात गहू, जवस यांसारखी पिके घेतली जातात. 

(७) लवणयुक्त व चोपण जमिनी :  विशिष्ट भौगोलिक स्थिती व कमी पावसाचा प्रदेश या भागांत या जमिनी मोठ्या प्रमाणात आढळतात. खाऱ्यापाण्याच्या सिंचनासाठी वापर, सिंचन म्हणून पाण्याचा अमर्याद वापर, पाण्याची पातळी वर असलेला भाग व निचऱ्याचा अभाव यांमुळेही या तऱ्हेच्या जमिनी तयार होतात. ज्या जमिनींत विद्राव्य लवणांचे प्रमाण ०.५ प्रतिशतपेक्षा जास्त असते, त्यांना लवणयुक्त जमिनी असे संबोधिले जाते. सोडियमयुक्त विद्राव्य लवणांची मृण्मय खनिजांशी रासायनिक प्रक्रिया झाली की, लवणयुक्त जमिनीचे चोपण जमिणीत रूपांतर होते व त्यांचे pH मूल्य ८.५ ते ९.० च्या पुढे आढळते. लवणयुक्त व चोपण जमिनीचे क्षेत्र सारखे वाढत असून सध्या त्याचे प्रमाण सु. ०.५० लाख हेक्टर आहे. या जमिनी रासायनिक दृष्ट्या सुपीक असल्या, तरी भौतिक व जैव दृष्ट्या पीक वाढीला प्रतिकूल असल्यामुळे त्यांची सुधारणा केल्याशिवाय त्या भरघोस पीक देत नाहीत. 

नैसर्गिक साधनसंपत्ती 

 जमीन, जलसंपत्ती, ऊर्जा-उद्गम, खनिज पदार्थ, वनसंपत्ती, पशुधन व सागरी संपत्ती यांचा यात समावेश होतो. याच नोंदीत शेतजमिनीविषयीची अधिक माहिती ‘मृदा’ या उपशीर्षकाखाली, तर विविध साधनसंपत्तीविषयीची काही माहिती व कोष्टकरूपातील आकडेवारी ‘आर्थिक स्थिती’ या उपशीर्षकाखाली आलेली आहे. 

 जमीन : प्रत्यक्ष लागवडीखालील, सध्या पडीत असलेली, वृक्षांच्या लागवडीखालील, वनांखालील, कायमची कुरणे व गवताळ प्रदेश, मशागतयोग्य पडीत, डोंगराळ भागातील व इतर मशागतीस अयोग्य आणि बिगरशेती अशी जमिनीची वर्गवारी करतात. महाराष्ट्रात ५ टक्के जमीन लागवडीखाली आणता येण्यासारखी आहे. १९८२ साली महाराष्ट्रात १.९८६ कोटी हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती आणि भारतातील लागवडीखालील क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा १२ टक्के होता.  भारतातील एकूण कृषिउत्पादनक्षमतेच्या मानाने महाराष्ट्राची कृषीउत्पादनक्षमता कमी आहे. अपुरे सिंचन, पावसाची अनिश्चितता आणि पर्जन्यच्छाया प्रदेशात मोडणारा बरच भाग, ही यामागील काही कारणे आहेत. 

जलसंपत्ती : जमिनीवरील व जमिनीखालील पाण्याचा उपयोग सिंचन, वीजनिर्मिती, घरगुती व औद्योगिक वापर आणि वाहतूक यांसाठी करता येतो. महाराष्ट्रात बहुतेक पाऊस ठराविक काळातच पडतो. शिवाय महाराष्ट्रातील ‘दक्षिण ट्रॅप’ या शेलसमूहाच्या रचनेमुळे भूजल संपत्तीवर मर्यादा पडल्या आहेत त्यामुळे पाण्याच्या वापरावरहीमर्यादा पडतात. शिवाय नद्या बारमाही वाहत नसल्याने धरणे मोठी बांधावी लागतात आणि कालव्यांची लांबीही वाढते; परिणामी खर्च वाढतो. जलवाहतुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात परिस्थिती अनुकूल नाही; विशेषतः औद्योगिक सांडपाण्यामुळे प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. 

सिंचन : महाराष्ट्राची सिंचनक्षमता ४५ लाख हेक्टर असून १९८१ साली २३ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली होते. १९६० पासून राज्यात सिंचनाचे बरेच प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सु. ५० टक्के सिंचन विहिरींद्वारे होते. त्याखालोखाल कालवे, तलाव (मुख्यत्वे भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत), उपसा जलसिंचन (मुख्यतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत) व कूपनलिका यांद्वारे सिंचन केले जाते. 

ऊर्जा-उद्गम : दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, पाणी (वीजनिर्मितीसाठी) व अणुइंधने हे प्रमुख ऊर्जा-उद्गम आहेत. यांपैकी महाराष्ट्रात दगडी कोळसा व पाणी हे उपलब्ध आहेत. अर्थात बाँबे हाय व त्यालगतच्या तेलक्षेत्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचा राज्याला उपयोग होत आहे. तारापूरची अणुवीज महाराष्ट्राला मिळत असली, तरी येथे अणुइंधनाच्या दृष्टीने उपयुक्त असलेली खनिजे आढळलेली नाहीत. या ऊर्जा साधनांशिवाय शेण (गोबर वायू गोवऱ्या), जैव वायू, लाकूड, लोणारी कोळसा, तसेच पशूंची व मानवी श्रमशक्ती ही ऊर्जेची साधनेही महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. सूर्याचे प्रारण, वारा, भरती-ओहोटी, लाटा व पृथ्वीतील उष्णता हे ऊर्जा-उद्गम वापरण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागांत आहे. वर्षातील बराच काळ महाराष्ट्रात चांगले ऊन पडते (उदा., मुंबई येथे दर दिवशी दर चौ. सेंमी. क्षेत्रावर सरासरी ७०१ कॅलरी उष्णता पडत असते) आणि महाराष्ट्रातीलखडक व माती गडद रंगाची असल्याने त्यांच्याद्वारे पुरेशी उष्णता शोषली जाते. किनारी भागात भरती-ओहोटीचा व लाटांचा, तर डोंगराळ आणि किनारी भागांत वाऱ्याचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करता येण्यासारखा आहे. 

दगडी कोळसा : भारतातील दगडी कोळशाच्या एकूण साठ्यापैकी सु. ४ टक्के (५०० कोटी टन) कोळसा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सर्व दगडी कोळसा अकोकक्षम आहे. मात्र काही थर पहिल्या व दुसऱ्या प्रतींचे असून त्यांतील कोळसा झरिया येथील कोकक्षम कोळशात १५ ते २० टक्के या प्रमाणात मिसळून वापरात येण्यासारखा आहे.  नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत मुख्यतः दगडी कोळसा आढळतो व तो गोंडवनी संघाच्या दामुदा मालेतील बाराकार समुदायातील खडकांत आढळतो. याची प्रमुख क्षेत्रे पुढील आहेत :

 

(१) वैनगंगा खोरे (कामटी, उमरेड इ.); (२) वर्षा खोरे (बांदर, वरोडा, वुन, बल्लारपूर, दुर्गापूर, वणी इ.) आणि (३) यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा एकमेकांना लागून असलेला सीमावर्ती भाग (घुगुस, तेलवासा). 

 खापरखेडा, बल्लारशा व पारस येथील औष्णिक वीज केंद्रांत, तसेच उद्योगधंदे व रेल्वे यांसाठी महाराष्ट्रातील दगडी कोळसा वापरला जातो. काही कोळसा प्रोड्यूसर नावाचा जळणाचा वायू निर्माण करण्यासाठी वापरता येण्यासारखा आहे, तर काही कोळशाचे कार्बनीकरण करून कोक, इंधन वायू, हलके तेल, अमोनियम सल्फेट इ. पदार्थ मिळविता येऊ शकतील. [⟶कोळसा, दगडी]. 

जलविद्युत् : महाराष्ट्रातील एकूण विजेपैकी ५० टक्क्यांहून जास्त वीज जलविद्युत् केंद्रामधून मिळते. १९८१ साली या विजेची अधिष्ठापित क्षमता १,२९७ मेवॉ. होती. पश्चिम घाटाची जलविद्युत् निर्मितिक्षमता १,०४० मेवॉ. काढण्यात आली असून कोयना(५४०मेवॉ.),खोपोली, मिरा व भिवपुरी (२७४ मेवॉ.), येलदरी (२२.५ मेवॉ.), राधानगरी (४.८ मेवॉ.) व भाटघर (१ मेवॉ.) ही या भागातील जलविद्युत् केंद्र होत. पूर्व महाराष्ट्रातील डोंगराळ भागीची काढण्यात आलेली जलविद्युत् निर्मितिक्षमता १,९०० मवॉ. आहे. 

महाराष्ट्रात एकूण २,०९३.८ कोटी किवॉ. ता. (१९८२-८३) वीजनिर्मिती होत असली, तरी उद्योगधंदे, शेती, वाहतुक, घरगुती वापर यांकरिता ती उपयोगात आणली जाते व राज्यात विजेचा नेहमी तुटवडा पडतो. यावर उपाय योजले जात असले, तरी ते कमीच पडतात. मध्य प्रदेश, कर्नाटक या शेजारच्या राज्यांतून वीज काही प्रमाणात घेतली जाते. 

 अणुवीज : महाराष्ट्रात तुर्भे व तारापूर येथे अणुप्रकल्प केंद्राच्या वापरांकरिता होते. तारापूर येथील अणुवीज निर्मितिकेंद्राची अधिष्ठापित क्षमता ४२० मेवॉ. असून येथे निर्माण होणारी वीज महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना पुरविण्यात येते. १९८२-८३ सालात या केंद्रामध्ये ६७.८९५ कोटी किवॉ. ता. एवढी वीज निर्मिती झाली. 

 खनिजसंपत्ती : खनिज पदार्था  पासून इंधनाशिवाय धातू, विविध उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल, बांधकामाची सामग्री इ. मिळतात. महाराष्ट्रात दगडी कोळशाशिवाय मँगॅनिजाची आणि लोखंडाची धातुके बऱ्याच प्रमाणात आढळतात. तसेच बॉक्साइट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट व बांधकामाचे खडक यांचे महत्त्वपूर्ण साठे महाराष्ट्रात असून डोलोमाइट, कायनाइट, सिलिमनाइट, सिलिकायुक्त वाळू व उद्योगधंद्यांत वापरल्या जाणाऱ्या मृत्तिका या खनिजपदार्थांचेही थोडे साठे महाराष्ट्रात आहेत. 

       महाराष्ट्राच्या १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज पदार्थ आढळतात व त्यांपैकी १६.४ टक्के क्षेत्राचे भूवैज्ञानिक मानचित्रण झालेले आहे. महाराष्ट्रातील बहुतेक खनिजसंपत्ती ⇨दक्षिण ट्रॅपखडकाच्या बाहेरील क्षेत्रात आणि मुख्यत्वे स्फटिकी व रुपांतरित खडकांत आढळते. पूर्व विदर्भ (चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर व यवतमाळ जिल्हे) व दक्षिण महाराष्ट्र (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड व ठाणे जिल्हे) या दोन भागांत महाराष्ट्रातील खनिज संपत्ती एकवटलेली आहे. 

 पूर्वी भंडारा व रत्नागिरी (मालवण) जिल्ह्यांत लोणारी कोळसा वापरून लोखंड बनविण्याच्या छोट्या भट्ट्या होत्या. त्यांकरिता इंधन व क्षपणकारक [⟶ क्षपण] म्हणून लोणारी कोळसा वापरीत. मोठ्या कारखान्यांच्या स्पर्धेमुळे हा उद्योग बंद झाला. चंद्रपूर भागात दगडी कोळसा काढण्यास एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास, तर मँगेनिजाचे धातुक काढण्यास १९०० च्या सुमारास सुरूवात झाली. तांब्यासाठी चंद्रपूर व रत्नागिरी जिल्ह्यांत आणि हिरे, सोने, शिसे, अँटिमनी वगैरेंचा इतरत्र शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. आता महाराष्ट्रातील खनिज संपत्तीच्या समन्वेषणाचे काम भूविज्ञान व खाणकाम संचालनालयातर्फे केले जाते. त्यासाठी भूवैज्ञानिक मानचित्रण, वेधन, गर्तन (खड्डे घेणे), खंदक खोदणे व रासायनिक विश्लेषण करणे ही कामे केली जातात. यांतून महत्त्वाच्या खनिज पदार्थांचा शोध लागू शकतो व त्यांच्या साठ्यांविषयी अंदाज करता येतात. हे संचालनालय खनिज पदार्थविषयीच्या माहितीचे संकलनही करते. शिवाय काही महत्त्वाच्याखनिजां च्या पूर्वेक्षणाचे कामही संचालनालयाने केले आहे

 

(उदा., १९७५−७७ या काळात नागपूर जिल्ह्यात दगडी कोळसा, काही धातू व सोने यांचे, तर भंडारा जिल्ह्यात कायनाइट, सिलिमनाइट यांच्यासह सर्व खनिज पदार्थांचे पूर्वेक्षण करण्यात आले होते). महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीचे उत्पादन वमूल्य कोष्टक क्र. १ वरून स्पष्ट होईल. पुढे महाराष्ट्रातील काही खनिज पदार्थाची माहिती थोडक्यात दिली आहे. 

मँगॅनीज धातुके : भारतातील यांच्या साठ्यांपैकी सु ४० टक्के साठे महाराष्ट्रात आहे. हे साठे मुख्यतः भंडारा जिल्ह्यात असून येथील काही साठे भारतातील मोठ्या साठ्यांपैकी आहेत. थोडे साठे नागपूर जिल्ह्यात आहेत. या भागातील धातुके गोंडाइट मालेच्या खडकांशी निगडीत असून सिलोमिलेन हे त्यांतील मुख्य खनिज आहे. बहुधा उघड्या खाणींतून व मानवी श्रमाचा वापर करून येथील धातुके काढण्यात येतात. कन्हान व तुमसर येथे फेरोमँगॅनीज बनविण्याची संयंत्रे उभारण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मँगनीज धातुक परदेशी निर्यात होते. रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांतही कमी दर्जाचे थोडे धातुक आढळते. 

लोह धातुक : देशातील २ टक्के लोह धातुकांचे साठे महाराष्ट्रात आहेत. हे सारे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व सिधुदुर्ग या जिल्ह्यांत आहेत. उच्च दर्जाचे धातुक धारवाडी संघाच्या खडकांशी निगडित असून हेमेटाइट हे यातील महत्त्वाचे खनिजआहे. हे मँगॅनिजाच्या धातुकाप्रमाणेच काढण्यात येते. टॅकोनाइट व जांभ्यात कमी दर्जाचे धातुक आढळते. पैकी टॅकोनाइट चंद्रपूर, गडचिरोली,नागपूर व भंडारा या आणि जांभा रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा या जिल्ह्यांत आढळतात. 

बॉक्साइट :  महाराष्ट्रात याचे ६.५ कोटी टन साठे असावेत. मुख्यतः कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे आणि थोड्या प्रमाणात सांगली व सातारा या जिल्ह्यांत हे आढळते. भारतातील याच्या उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. 

इस्मेनाइट : हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सु. ४० किमी. लांबीच्या किनारी भागातील वाळूत आढळते. हा साठा २० लाख टन असावा. या वाळूत २० ते ७४ टक्क्यांपर्यंत इल्मेनाइट असून शुद्धीकरण केल्यास तिचा उपयोग करता येईल. त्रावणकोर किनाऱ्यावरील वाळूच्या मानाने येथील वाळू कमी दर्जाची असून येथे तिच्यात झिर्कॉन आढळत नाही. 

क्रोमाइट :  महाराष्ट्रात या खनिजाचे ५.५ कोटी टन साठे असून ते भंडारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांत आहेत. 

चुनखडी, कंकर व डोलोमाइट : यांचा महाराष्ट्रातील साठा भारताच्य ९ टक्के व उत्पादन २ टक्के आहे. यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतील यांचे साठे विंध्यन खडकांतील आहेत. अंतरा-ट्रॅपी थरांमधील चुनखडी, तसेच कंकर बहुतेक (विशेषतः नागपूर, नांदेड,सांगली, सिंधुदुर्ग व सातारा) जिल्ह्यांत आढळतात. डोलोमाइट गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत आढळते. १९६१ चे पायाभूत वर्ष धरून कंसातीलआकडे शेकडेवारी दर्शवितात. आधार : (१) भारतीय खाण कार्यालय, भारत सरकार, नागपूर.

(२) साहाय्यक मीठ आयुक्त, भारत सरकार, मुंबई (फक्त मिठाकरिता).   कायनाइट व सिलिमनाइट : ही दोन्ही खनिजे मुख्यत्वे भंडारा जिल्ह्यांत आढळतात. भारतातील कायनाइटच्या उत्पादनापैकी सु. १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.   यांशिवाय महाराष्ट्रात पुढील खनिज पदार्थही थोड्या प्रमाणात आढळतात. सिलिकामय वाळू मुख्यतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत आढळते व १९८१ साली ७४ हजार टन वाळू काढण्यात आली. बांधकामासाठी उपयुक्त असे खडकही महाराष्ट्रात आढळतात. पैकी बेसाल्ट सर्वत्र आढळतो. कोकणातील जिल्हे, तसेच कोल्हापूर, सातारा, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत जांभा आढळतो. चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ग्रॅनाइट व पट्टीताश्म; नागपूर, अमरावती व चंद्रपूर जिल्ह्यांत वालुकाश्म; भंडाऱ्यात क्वॉर्टसाइट आणि नागपूर जिल्ह्यात थोडा संगमरवर, हे खडक आढळतात. विटांची माती, वाळू, रेती, चुनखडी इ. बांधकामास उपयुक्त सामग्रीही सर्वत्र आढळते. यांशिवाय चिनी माती (केओलीन), लिथोमार्ज तसेच गेरू (काव), पिवडीसारखी रंगद्रव्ये व पांढरी मातीही बऱ्याच ठिकाणी आढळते. अभ्रकाच्या दृष्टीने कडवळ (सिंधुदुर्ग) येथील साठा महत्त्वाचा असून पूर्व विदर्भातही ते थोड्या प्रमाणात आढळते. टंगस्टन, तांबे, शिसे, जस्त, अँटिमनी इत्यादींची उपयुक्त खनिजे ; क्वॉर्ट्रझ, फेल्स्पार, बराइट तसेच बेसाल्टच्या पोकळ्यांत साचलेली कॅल्सेडोनी, अकीक, जमुनिया, ओपल यांसारखी

उपरत्ने; कुरूविंद, गार्नेट, सोपस्टोन, फ्लिंट, चर्ट, ग्रॅफाइट, अँडॅल्यूसाइट, विविध प्रकारची झिओलाइटे इ. उपयुक्त खनिजेही महाराष्ट्रात आढळतात. यांपैकी काही खनिजेउच्चतापसह (उच्च तापमानाला न वितळता टिकून रहाणारे) व अपघर्षक (घासून वा खरवडून पृष्ठभाग गुळगुळीत करणारे) पदार्थ म्हणून आणि खतांसाठी उपयुक्त आहेत. शिवाय भंडाऱ्यातील अभ्रक, कायनाइट व सिलिमनाइटयुक्त   क्वॉर्ट्झाइटात  ०.५ टक्का व्हॅनेडियम, नागपूर जिल्ह्यातील काही मँगॅनीज धातुकांत गॅलियम आणि भंडाऱ्याच्या हिरवट अभ्रकात सिझियम ही दुर्मिळ मूलद्रव्ये थोड्या प्रमाणात आहेत. किनारी भागात, विशेषतः  रायगड, ठाणे व मुंबईलगतच्या भागात मीठ बनविण्यात येते. खाण्याशिवाय रासायनिक उद्योगांत व खते बनवितानाही याचा वापर होतो. शिवाय रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिधुदुर्ग इ. जिल्ह्यांत आढळणाऱ्या उन्हाळ्यांतील (गरम झऱ्यांतील) खनिज जल हे काही रोगांवर उपयुक्त असल्याचे मानतात. 

वनसंपत्ती :

महाराष्ट्राचे २१ टक्के क्षेत्र (१९८१-८२ साली सु. ६३,९५३ चौ. किमी.) वनांखाली असून यापैकी ५६,१३३ चौ. किमी. वनक्षेत्र खात्याकडे; ५,१३९ चौ. किमी. महसूल खात्याकडे; १,२५५ चौ. किमी. वनविकास आयोगाकडे वर्ग केलेले आणि १,४२६ चौ. किमी. खाजगी क्षेत्र वनखात्याकडे आलेले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती, यवतमाळ, धुळे, नासिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत दाट व महत्त्वाची वने आहेत. 

 इमारती व जळाऊ लाकूड, बांबू, डिंक, मध, लाख, चंदन, राळ, वैरण (गवते), कात, पाने (तेंडू, पळस, चौरा), तंतू (घायपात, भेंडी इ.), तेले (सिट्रोनेला, रोशा ही गवते; पिशा, निंब, करंज इ. वृक्ष), सावरीचा कापूस इ. अनेक उपयुक्त वस्तू वनांपासून मिळतात. शिवाय जमिनीची धूप थांबणे आणि सुपिकता टिकणे, पूरनियंत्रण, हवामानाचा समतोल राखला जाणे, वन्य जीवांचे रक्षण इ. अप्रत्यक्ष फायदेही वनांपासून होतात. 

चौथ्या पंचवार्षिक योजनेपासून वनविकासाच्या दृष्टीने पुढील प्रकाराचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत : वठलेल्या वनांच्याजागी नवीन वनांची लागवड करणे, वनसंपत्ती मिळविणे व तिचा अपव्यय टाळणे, उद्योगधंद्यांच्या दृष्टीने वनविकास करणे वगैरे. नवीन वनक्षेत्रेही निर्मिण्यात येत आहेत (उदा. पुळण असलेल्या भागात खडशेरणीची, तर पडीत व हलक्या जमिनीत निलगिरी, सुबाभूळ इ.वृक्षांची लागवड करण्यात येत आहे). शिवाय ग्रामवनांच्या विकासासाठी प्रयत्न चालू आहेत. राज्यात ३० रोपवाटिका असून त्यांच्याकडून रोपे पुरविण्यात येतात आणि रोपांची निवड, निगा व लागवड यांविषयी माहिती देण्यात येते. 

वन्य प्राणी व वने यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने निर्मिण्यात आली आहेत. ताडोबा, पेंच, नवेगाव बांध, बोरिवली (संजय गांधी) ही राष्ट्रीय उद्याने व मेळघाट, नागझिरा, किनवट, रेहेकुरी, श्रीगोंदा, राधानगरी, बोर, यावल, तानसा इ. वैशिष्ट्यपूर्ण अभयारण्ये महाराष्ट्रात आहेत. शिवाय सागरेश्वर व कोयना उद्याने, राजगड अभयारण्य इ. उभारण्याच्या योजना आहेत. 

प्राणी संपदाप्राण्यांच्या निवासाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पुढील चार भौगोलिक विभाग पाडता येतील : (१) पश्चिमेकडील कोकणपट्टी, (२) सह्याद्रीच्या रांगा, (३) पूर्वेकडील पठारी प्रदेश आणि (४) उत्तरेकडील सातपुडा पर्वत व लगतचा सखल प्रदेश. महाराष्ट्रात सापडणारे पुष्कळसे प्राणी भारतात इतरत्रही आढळतात. या प्राण्यांत  पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी प्रमुख होत. या प्राण्यांचे मत्स्य, उभयचर (जमिनीवर आणि पाण्यातही राहणारे), सरीसृप (सरपटणारे), पक्षी व सस्तन प्राणी हे पाच मुख्य वर्ग होत.  

महाराष्ट्राचे प्राणिजीवन बरेच समृद्ध आहे. येथे सस्तन प्राण्यांच्या सु. ८५ पक्ष्यांच्या ५०० हून जास्त, सरीसृप प्राण्यांच्या १०० हून अधिक, माशांच्या सु. ७०० व कीटकांच्या २५,००० हून जास्त जाती आढळतात. यांशिवाय उभयचर व इतर प्राणीही कमीअधिक प्रमाणात आहेतच. महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रमुख प्राण्यांची माहिती वर्गवारीनुसार पुढे दिली आहे. 

 महाराष्ट्रात लांडगे उघड्या माळरानावर आणि कोल्हे, खोकडे कोणत्याही जंगलात आढळतात. जंगली कुत्रे रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, भंडारी व चंद्रपूर या जिल्ह्यांत दिसून येतात.  रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अहमदनगार, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांतील जंगलांत अस्वले आहेत.भंडारा, अमरावती व सातारा येथील जंगलांत पाणमांजरे (ऊदमांजरे) आढळतात. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील जंगलांत कस्तुरी मांजरे (जवादी मांजरे) आहेत. महाराष्ट्रात मुंगसाच्या दोन जाती असून हा प्राणी सर्वत्र कमीअधिक प्रमाणात सापडतो. तरस हा भटका प्राणी महाराष्ट्रात जेथे जेथे साळी, मुंगसे व ढाण्या वाघ आढळतात तेथे तेथे आढळतो. 

अकोला, अमरावती, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांतच वाघ सध्या आढळतात. पूर्वी वाघांची संख्या पुष्कळ होती. आज महाराष्ट्रात अवघे १६० वाघ आहेत. वाघाला कायद्याने संरक्षण दिलेले असून त्यांची संख्या वाढावी म्हणून भारतातील इतर काही राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही त्यांच्यासाठी राखीव उपवने ठेवण्यात आली आहेत. बिबळ्याची महाराष्ट्रात एकच जात आढळते. रानमांजरेही महाराष्ट्रातील जंगलात आहेत. शुष्क जंगलातील मांजरे, तांबड्या ठिपक्यांची मांजरे व वाघाटी ह्या रानमांजरांच्या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या जाती आहेत.  

 बाजरा (रेंटल) हा मांसाहारी गणातील प्राणी भंडारा जिल्ह्यात आढळतो. जाहक चिचुंदरी हे कीटकपक्षी प्राणी महाराष्ट्रातील जंगलांत आढळतात. महाराष्ट्रात फळे खाणाऱ्या वटवाघळांच्या २५ जाती आहेत. 

खार, घूस, उंदीर व साळ हे महाराष्ट्रात प्रामुख्याने आढळणारे कृंतक (कुरतडून भक्ष्य खाणारे) प्राणी आहेत. मोठी उडणारी खार पुष्कळ जंगलांत आढळते. हल्ली यांची संख्या कमी झाली आहे. महाराष्ट्रात साळी उघडे माळरान अगर आर्द्र वा शुष्क जंगले यांत कोठेही आढळतात. महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा ससा हा लिपस निग्निकोलीस या जातीचा आहे. 

 रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती व भंडारा या जिल्ह्यांतील डोंगराळ जंगलांत गवे मोठ्या प्रमाणावर आढळतात. दक्षिण चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूच्या जंगलांत रानरेडे आहेत. सातारा, अहमदनगर, बुलढाणा, परभणी व भंडारा जिल्ह्यांतील जंगलांत काळवीट आढळतात. नीलगाय हा प्राणी महाराष्ट्रातील काही जंगलांत दिसून येतो. सांबर व हरणे हे कळप करून राहणारे प्राणीही महाराष्ट्रातील जंगलांत आढळतात. ठिपकेवाली हरणेही दिसून येतात. दाट झुडपांच्या जंगलांत भेकरे आढळतात. पिसोरा हे मृगासारखे प्राणीही काही जंगलांत आढळतात. महाराष्ट्रात रानडुकरे बहुतेक सर्व जंगलांत दिसून येतात. खवल्या मांजर हा मुंग्या व वाळवी खाणारा सस्तन प्राणीही जंगलांत आढळतो. 

महाराष्ट्रात निरनिराळ्या जातींची माकडे व वानरे आढळतात. लाल तोंडाची माकडे (टोपी माकडे) मुंबई, पुणे, नासिक, अहमदनगर, सातारा व सांगली या भागांतील जंगलांत आहेत. ऱ्हिसस माकडे मुंबई व नासिक येथे मनुष्यवस्तीच्या जवळपास आढळतात. हनुमान वानरे किंवा काळ्या तोंडाची वानरे महाराष्ट्रात सर्वत्र दिसून येतात. अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर या भागांत त्यांचे प्रमाण अधिक आहे. तेवांग (सडपातळ लोरिस) हा निशाचर सस्तन प्राणी खंडाळ्याच्या आसपास दाट जंगलात आढळतो. 

 महाराष्ट्रास बराच मोठा समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे काही सस्तन जलचर प्राणी पुष्कळदा महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर येतात. देवमासा, डॉल्फिन, पॉरपॉइज (शिंशुक) यांसारखे काही प्राणी पुष्कळदा किनाऱ्यावर आढळले आहेत. महाराष्ट्रातील नद्या, सरोवरे व जलाशय यांतही बरेच सरीसृप, उभयचर व मत्स्य या वर्गांतील प्राणी आढळतात; पण सस्तन प्राणी त्या मानाने नाहीतच म्हटले तरी चालेल. 

महाराष्ट्रात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या ५०० जातींपैकी ३०० स्थायिक असून २०० स्थलांतराकरिता हिवाळ्यात महाराष्ट्रात येतात. या वेळी नद्या, तळी व सरोवरे ही पाण्यानी भरलेली असून येथे आढळणाऱ्या पक्ष्यांत बगळे, करकोचे, क्रौंच, हंसक, मोर, रानकोंबडे, होले, पोपट, माळढोक इ. जातींची उपस्थिती असते. माळढोकसारख्या काही जाती विनाशाच्या मार्गावर असल्याने त्यांच्या शिकारीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. 

 सरीसृप प्राण्यांत विविध जातींचे साप, सरडे व कासवे महाराष्ट्रातील जंगलांत, जलाशयांत व नदीपात्रांत आढळतात. सापाच्या ३० जाती महाराष्ट्रात आढळतात आणि त्यांपैकी नाग, मण्यार व घोणस सर्वत्र आढळतात. फुरसे विशेषेकरून रत्नागिरी जिल्ह्यात आढळते. 

राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये : वन्य प्राण्यांना संरक्षण देऊन त्यांची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुढील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये निर्माण केली आहेत. भौगोलिक व हवामानाचा विचार करता ही उद्याने काही विशिष्ट प्राण्यांस उपयुक्त आहेत. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही पशुपक्ष्यांनाही या अभयारण्यांमुळे संरक्षण मिळते.  

bottom of page